वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील यांना अटक   

वैष्णवी आत्महत्या प्रकरण आठवडाभर होते फरार
 
पिंपरी : वैष्णवी आत्महत्या प्रकरणी अखेर पिंपरी- चिंचवड पोलिसांनी वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे या दोघांना स्वारगेट मधून अटक केली. या आरोपींचा शोध आठवडाभर सुरु होता. या प्रकरणामुळे एकूणच राज्याचे राजकारण चांगलेच तापले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लग्नातील उपस्थितीवरूनही चर्चा होत होती. पिंपरी- चिंचवड पोलिसांनी आज अखेर वैष्णवीचा सासरा आणि दिराला ताब्यात घेतले. पहाटे साडे चारच्या  सुमारास त्यांना अटक केल्याची माहिती मिळते. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन अटक केली.
 
गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या दिवसापासून राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे हे फरार होते. पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना आधीच पोलिसांनी अटक केलेली. त्यांना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 
 
राजकीय नेत्यांनी गुरुवारी दिवसभर कस्पटे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले होते. पोलिसांची सहा पथक आरोपींचा शोध घेत होते. अखेर त्यांना स्वारगेटमधून अटक केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील फोनवरून कस्पटे कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला होता. 
 
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना शोधण्यासाठी गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्याच्या एकूण आठ टीम त्यांच्या मागावर होत्या. या प्रकरणात पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे हे स्वतः लक्ष ठेवून होते. आवश्यक त्या सूचना देत होते. प्रत्येक वेळी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा ठिकाण (लोकेशन) बदलत असल्याने त्यांना पकडणे अवघड होत. अखेर त्यांना आज स्वारगेट मधून साडेपाचच्या सुमारास अटक केली.
 
वैष्णवी चा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे दोघे तळेगाव येथील एका हॉटेलात मटणावर ताव मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. हे दोघे सात दिवस एवढे बिन बोभाट फिरत होते मग पोलिसांना का सापडले नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Related Articles